कृषी व पर्यावरणतज्ज्ञ तसेच निखिल लॅबचे डॉ. सुहास खांबे

Category: प्रदूषण आणि पर्यावरण
Published: Sunday, 19 September 2021
Written by Super User

डॉ. सुब्बाराव यांनी स्थापन केलेल्या इपीआरएफ या संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने सुहास खांबे यांनी साखर कारखाने व डिस्टीलरी यांच्या सांडपाण्यावर मूलभूत संशोधन करून वालचंद कॉलेजमधून मायक्रोबायॉलॉजीमध्ये पीएचडी प्रकल्प पूर्ण केला. नंतर ज्ञानदीपच्या सौ. शुभांगी रानडे यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये सुयश कॉम्प्युटर्स ही संस्था चालवून संगणक प्रशिक्षणाचे काम केले. स्वतःची निखिल अनॅलिटिकल लॅब उभारून पाणी, माती व अन्नपदार्थ तसेच शेतीसंबंधित जीवाणू खते व वनस्पतींवरील रोग नियंत्रणाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत. नवसंशोधनासाठी स्थापन झालेल्या सिस्टेड फौंडेशनचे ते कार्यवाह आहेत. १९८१ पासून विविध सार्वजनिक संस्थांत शैक्षणिक व संशोधन कार्यात ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांचेबरोबर सतत कार्यमग्न राहून आता यापुढे ज्ञानदीपच्या शेतीविषयक नव्या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत. डॉ. सुहास खांबे यांच्या निखिल लॅबमध्ये डॉ. रानडे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत.

नीरी, नागपूरमधील माझे अनुभव - डॉ. सु. वि. रानडे

Category: प्रदूषण आणि पर्यावरण
Published: Monday, 14 June 2021
Written by Super User

१९६६ साली सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई सिव्हील पास झाल्यानंतर लगेच मी त्या कॉलेजमध्ये सिव्हील डिपार्टमेंटमध्ये नोकरीस प्रारंभ केला. माझ्या सुदैवाने त्याच वर्षी अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीतून एमएस झालेले सुब्बाराव वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. अमेरिकेतील त्यांचे पर्यावरणविषयक नवे ज्ञान आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची मनीषा बाळगून मी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या पर्यावरण अभियांत्रिकी विषयात एम.ई. करण्याचे ठरविले.


त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ हा विषय शिकविला जात असला तरी त्याची प्रयोगशाळा नव्हती. नीरी, नागपूरमधील डायरेक्टर डॉ. जी. जे. मोहनराव हे सुब्बाराव यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ओळखीने नीरीत पर्यावरण प्रयोगशाळेत तीन महिने प्रशिक्षण घेण्याचे मी ठरविले. जागतिक संशोधकांच्या गोष्टी वाचल्या असल्याने भारतातील महत्वाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत मला काम करायला मिळणार या कल्पनेने मी हुरळून गेलो. पण मला नागपूर नवखे होते आणि इतक्या दूर परक्या शहरात कसे रहायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण माझे जेष्ठ सहकारी प्रा. श्रीधर करंदीकर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या घरी माझ्या राहण्याची सोय केली. युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून १९६७ साली मी नागपूरला गेलो. त्यांच्या तीन भाऊ व आईवडील असणा-या कुटुंबात त्यांनी आपलेपणाने मला सामावून घेतले. त्यांचे घर सीताबर्डीत होते. तेथून नीरी ३ किलोमीटर दूर होली. आमच्या घराशेजारी राहणारे देशमुख नीरीमध्ये काम करीत असल्याने त्यांचेबरोबर मी बसने नीरीत जाई.


तेथील प्रत्यक्ष पाणी, मलजल, घनकचरा, हवाप्रदूषण या वेगवेगळ्या विभागात प्रत्येकी १५ दिवस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. तेथील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली. डॉ. एस. एन. कौल, डॉ. अलगरस्वामी, डॉ. लक्ष्मीनारायण, डॉ. देशपांडे इत्यादींनी मला बहुमोल मार्गदर्शन केले.


त्यावेळी मी जरा धीट व स्पष्टवक्ता होतो. कोणाचीही तमा न बाळगता मी प्रश्न विचारत असे. माझे मतही मांडत असे. नीरीबद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पनांना मात्र मोठा तडा गेला. तेथे घड्याळाच्या वेळेनुसार व नियमाप्रमाणे चाललेले काम मला आवडले नाही. कर्मचारी, अधिकारी यांच्या संघटना कायदेशीर बाबींचा अतिरेक, विभागाविभागातील दुरावा यामुळे माझे मन खिन्न झाले. संशोधन वा नवनिर्मितीसाठी भूक तहान विसरून व काळवेळाची पर्वा न करता धडपडणा-या शास्त्रज्ञांऐवजी मला चाकोरीबद्ध काम करणारे व पगार आणि बढती आणि अधिकार यात मशगुल असणा-या लोकांचेच तेथे प्राबल्य असल्याचे जाणवले. संशोधनासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असूनदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन येथे का होत नाही असे मी डॉ. मोहनराव यांना विचारले. तेव्हा त्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे संशोधन प्राथमिकता बदलत राहिल्याने आणि व्यवस्थापनाला मर्यादित अधिकार असल्याचे कारण सांगितले आणि आपली हतबलता व्यक्त केली. अर्थात माझा हा अनुभव १९६८ सालातील आहे. आणि आता त्यात बरेच चांगले बदल झाले असतील असे मला वाटते.

नागपूरचा उन्हाळा, तेथील व-हाडी भाषा, लोकांची आदरातिथ्य व मदत करण्याची वृत्ती आणि करंदीकरांच्या घरातील खेळीमेळीचे प्रसंग आजही माझ्या मनात ताजे आहेत.

नागपूरला पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळेत प्रदीर्घ काळ अनुभव घेतल्याने वालचंद कॉलेजमध्ये परतल्यानंतर आम्ही पब्लिक हेल्थ लॅब उभी करायचे मनावर घेतले. कॉलेजचे प्राचार्य श्री. कानिटकर यांनी यासाठी पूर्ण सहकार्य दिले. बीईच्या क्लासरूममध्येच लाकडी पार्टिशन घालून आम्ही प्रयोगशाळा उभारली. सुब्बाराव कॉलेज कॅंम्पसमध्येच रहात असल्याने कॉलेज सुटल्यानंतर रात्रीपर्यंत आणि शनिवारी रविवारी पूर्ण दिवस आम्ही प्रयोगशाळेत काम करीत असू. प्राचार्य कानिटकरही रविवारी प्रयाोगशाळेत येऊन आम्हाला प्रोत्साहन देत.
आज वालचंद कॉलेजमधील सुसज्ज प्रयोगशाळा बघताना नागपूरच्या नीरीमधून आणलेल्या बीजाचा वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते.
या जाणिवेतूनच नागपूरला ज्ञानदीपची शाखा काढण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.


डॉ. एन. एस. रमण यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला. ज्या नीरीत मी प्रयोगशाळेचे पहिले धडे गिरविले. त्याच नीरीतील अत्युच्च पदावर असणारी व्यक्ती ज्ञानदीपची पर्यावरण शाखा तयार झाली हे मी माझे परमभाग्य समजतो.

समुद्रमंथन योग्य की अयोग्य ?

Category: प्रदूषण आणि पर्यावरण
Published: Friday, 01 June 2018
Written by Super User
देव आणि राक्षस यांनी एकत्र मिळून समुद्रमंथन केले आणि समुद्राच्या तळाशी असणारी चॊदा रत्ने मिळविली अशी कथा आहे. मात्र या रत्नांमध्ये अमॄत आणि विष यांचे कलशही होते. ज्याला अमॄत पाहिजे त्याने विषही घेतले पाहिजे अशी अट असल्याने राक्षसांनी त्यास नकार दिला. मात्र देवांनी हे आव्हान स्वीकारले आणि शंकराने विष प्राशन करून देवांना अमॄत मिळवून दिले.

आजच्या घडीलाही ही कथा लागू पडते. उद्योग व विकास करताना पर्यावरणाचा र्‍हास व प्रदूषण हे धोके उद्‍भवतात. मानवाच्या प्रगतीसाठी व रोजगार्निर्मिती आणि आर्थिक उन्नतीसाठी विकास ही एक आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे प्रदूषणाची भिती बाळगून विकासाला विरोध करणे चुकीचे आहे.

सुदॆवाने प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे. शासनानेही पर्यावरण रक्षणासाठी उद्योजक व प्रकल्प उभारणार्‍या संस्थांवर योग्य ती उपाययोजना करण्याविषयी कडक निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर आवश्यक नियंत्रण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतरच मुख्य उद्योग वा प्रकल्प सुरू करण्याची संमती दिली जाते.

एवढे असूनही प्रत्यक्षात प्रदूषण होत असल्याचे दिसत असल्याने जनतेचा प्रदूषण नियंत्रणावरील विश्वास उडाला असून त्यांचा कोणत्याही नव्या उद्योगास वा प्रकल्पास विरोध होत आहे.


येथे उद्योग वा प्रकल्प करणार्‍याची प्रदूषण नियंत्रण करण्याविषयी अनास्था तसेच तपास यंत्रणांमधील भ्रष्टाचार हे महत्वाचे कारण असून त्यावर अंकूश ठेवणाची गरज आहे.हे काम जनताच करू शकते. मात्र केवळ आंदोलन व उद्योगाला विरोध असे त्याचे स्वरूप न राहता कायदा व तंत्रज्ञान यांची प्रभावी अंमलबजावणी होते आहे का हे तपासण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील तज्ञ व अभियंते यानी यात पुढाकार घेऊन जनतेचे व स्वयंसेवी संस्थांचे नेतृत्व करावयास हवे.

असे झाले तर उद्योग, विकासक तसेच प्रदूषण नियंत्रक यांच्यावर प्रभावी अंकुश ठेवता येईल व पर्यावरणाचा र्‍हास न होता विकास साधता येईल.

प्रदूषण नियंत्रण शिक्षणाची गरज

Category: प्रदूषण आणि पर्यावरण
Published: Saturday, 02 June 2018
Written by Super User
शासनाने पर्यावरण शिक्षण हा विषय सर्व शॆक्षणिक स्तरांवर आवश्यक ठरवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत पर्यावरण प्रदूषणाबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. तसेच पर्यावरण रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. अनेक पर्यावरण विषयातील शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते याबाबतीत पुढाकार घेऊन स्वच्छता, वॄक्षसंवर्धन, वन्यप्राणी संरक्षण यासारखे विधायक कार्य करीत आहेत.

मानवाच्या प्रगतीसाठी पर्यावरणाचा र्‍हास न होता विकास कसा साधता येईल या विषयावर सार्‍या जगात संशोधन सुरू आहे.

लोकसंख्या वाढ व शहरीकरण यामुळे आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर वेळीच उपाययोजना होण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांची वाढ, पायाभूत सुविधांची उभारणी, दळणवळण आणि उर्जानिर्मिती यामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही तर बेरोजगारी, गरीबी, वर्गकलह व यादवी माजून राष्ट्राची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.

उद्योगाची उभारणी करायची तर जमीन, पाणी व विजेची उपलब्धता, रस्ते वा रेल्वे मार्ग यांची आवश्यकता असते. जमीन पडीक असली तरी त्याचा गुरांना चारा मिळण्यासाठी उपयोग होत असतो. वनजमीन असली तर वनखात्याची संमती मिळवावी लागते. तसेच वॄक्षतोड अपरिहार्य असते. शेतजमीन असेल  शेतकरी विस्थापित होतात व त्यांना पर्यायी जमीन द्यावी लागते. पाण्यासाठी धरणे बांधावी लागतात. कोळसा, तेल वा वीजनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागते. या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाची हानी होते. याशिवाय उद्योगातून बाहेर पडणार्‍या धूर, काजळी व सांडपाण्यामुळे भोवतालच्या पर्यावरणाला अधिक धोका पोहोचू शकतो.

विकासप्रकल्पांमुळे भविष्यात पर्यावरणाची किती हानी होऊ शकेल याविषयी जनतेच्या मनात संभ्रम असतो. पूर्वी झालेल्या विकास कामांमुळे वा कारखान्यांमुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान पाहून विकास म्हणजे पर्यावरणाचा नाश ही कल्पना लोकांच्या मनात पक्की झाली आहे. त्यामुळे विकासास विरोध हे सामाजिक वा राजकीय चळवळीचे अमोघ शस्त्र बनले आहे. याचा परिणाम म्हणजे विकासाच्या रथाची चाके सामाजिक विरोधाच्या दलदलीत अडकून बसत आहेत.

पर्यावरण शास्त्र हे पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत असणार्‍या घटकांचा अभ्यास करते तर पर्यावरण अभियांत्रिकी प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करते. विज्ञान व तंत्रज्ञान यातील संशोधनातून अनेक प्रदूषण नियंत्रक साधनांची निर्मिती केली असून हवा, पाणी व जमीन यांच्या नॆसर्गिक गुणधर्मात प्रदूषणामुळे हानीकारक बदल होऊ नयेत यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित केल्या आहेत. नव्या उद्योगांसाठी या यंत्रणांचा वापर करणे कायद्याने बंधनकारक असल्याने पुढील काळात प्रदूषणाचा धोका राहाणार नाही. सध्या चालू असणार्‍या व प्रदूषण करणार्‍या उद्योगांनाही अशा यंत्रणा बसविण्याची व त्या योग्य प्रकारे चालविण्याची कायद्याने सक्ती करण्यात आली आहे.


कारखान्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर, धूरातील काजळी व दूषित विषारी वायू  काढून हवा प्रदूषण होणार नाही याची खात्री देणारी प्रदूषण नियंत्रण व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. दूषित पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा सिंगापूरमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. भावनगर, चेन्नई तसेच परदेशात समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळविण्याच्या मोठ्या यंत्रणा यशस्वीपणे चालविण्यात येत आहेत. घनकचर्‍याचे रूपांतर शेतीसाठी आवश्यक असणार्‍या खतात करण्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. कारखान्याच्या वा शहराच्या सांडपाण्याचा व घनकचर्‍याचा उपयोग करून बायोगॅस व खतनिर्मिती करण्याच्या विविध पद्ध्ती विकसित झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर प्लॅस्टिक, वॆद्यकीय  व इलेक्ट्रॉनिक कचर्‍यातून उपयोगी वस्तूंची निर्मिती व उर्जा मिळविण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शांततेसाठी अणुशक्तीचा वापर करता यावा यासाठी किरणोत्सर्गी प्रदूषकांवर प्रक्रिया करण्यात यश मिळाले आहे.

दुर्दॆवाने सध्याच्या पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रदूषण नियंत्रण विषयक तंत्रज्ञानाविषयी फारच त्रोटक माहिती दिली जाते. साहजिकच पर्यावरण व प्रदूषणामुळे होणारी हानी याबाबतीतच प्रबोधन व जनजागॄती झाल्याने सर्वसामान्य जनता विकासप्रकल्पांच्या विरोधात उभी राहिली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व अभियंते यांनी जनतेला प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेच्या कार्याची तसेच पर्यावरण रक्षणाविषयी शासनाने केलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती द्यावयास हवी  तसेच अभ्यासक्रमात  त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.

 ज्ञानदीप फॊंडेशनने याबाबतीत जनजागॄती करण्यासाठी www.envis.org www.green-tech.biz ही दोन संकेतस्थळे विकसित केली आहेत.



त्यापॆकी www.envis.org या संकेतस्थळावर पर्यावरण शास्त्र, प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान आणि कायदे यांची सर्वंकष माहिती दिली आहे तर www.green-tech.biz या संकेतस्थळावर पर्यावरणपूरक बांधकाम व वस्तूंची निर्मिती तसेच सॊरशक्तीचा वापर याविषयी ज्ञानदीप फॊंडेशनच्या परिसंवादांचॆ समालोचन देण्यात आले आहे.

त्यांना बोलते करा.

Category: प्रदूषण आणि पर्यावरण
Published: Wednesday, 22 February 2017
Written by Super User
मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही हे एका दृष्टीने बरेच आहे. कारण त्यांना बोलता आले असते तर आपण माणसे त्या प्राण्यांपेक्षाही किती खालच्या दर्जाचे आहोत हे त्यांनी आपल्याला तोंडावर सुनावले असते. मोठ्या प्राण्यांच्या बाबतीत त्याचे दुःख आपल्याला समजू शकते. बैलांवर मारले जाणारे चाबकाचे फटकारे, सायकलीला उलट्या बांधून विक्रीस आणलेल्या कोंबड्या, पाय बांधून नेली जाणारी डुकरे, कसायाच्या तावडीत सापडलेली गुरे, पाण्याबाहेर काढल्यावर तडफडणारे मासे हे पाहिले की कोणाही संवेदनशील माणसाचे मन हळहळते. साप, उंदीर, बेडूक या प्राण्यांचे दुःख आपल्याला फारसे जाणवत नाही. किडा, मुंगी यासारख्या लहान कीटक यांच्याबाबतीत त्याना दुःख होत असेल की नाही याचा आपण विचारच करीत नाही. झाडांना संवेदना नसतातच. अशी आपली खात्रीच असते.

पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या संवेदनांची माणसाला जाणीव करून देण्याची गरज भासू लागली. मग त्यांच्या अन्नपाण्याच्या गरजांविषयी माणूस गांभीर्याने विचार करू लागला. त्यांचे संरक्षण व संवर्धन माणसाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने आवश्यक आहे हे समजल्याने त्यांच्याबद्दलचा बघण्याचा माणसाचा दृष्टीकोन आता बराच बदललेला आहे. या बदललेल्या दृष्टीकोनाचा परिणाम म्हणून वन, वन्यप्राणी व जैवविविधता संरक्षण कायदे अस्तित्वात आले. अभयारण्ये व वृक्षारोपणासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र हे सर्व करत असताना त्यांच्या संवेदनक्षमतेचा विचार न होता माणसाच्या भवितव्याविषयी वाटणारी काळजी ही मुख्य प्रेरणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रखर संवेदनशीलता ही माणसाला मिळालेली एक अप्रतिम देणगी आहे. कवी, साहित्यिक वा कलाकार यांना निसर्गातील प्रत्येक गोष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कार होतो. त्यातून त्यांची प्रतिभा व नंतर कलाकृती निर्माण होते. शास्त्रज्ञाला निसर्गातील कार्य कारण भावाचा शोध घ्यावयाचा असल्याने त्याचेही मन तसेच संवेदनशील असावे लागते तरच आपल्या बुद्धीचा वापर करून त्या माहितीचा मानवाच्या कल्याणासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शोध घेण्याचे कार्य तो करू शकतो.

निर्जीव पदार्थांना संवेदना नसते. मात्र उपयुक्त निर्जीव पदार्थ व वस्तूंना विज्ञानाच्या साहाय्याने आपण संवेदनशील बनवू शकतो. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग करून तिजोरीची राखण करण्यासाठी वा परिसरावर नजर ठेवण्यासाठी निर्जीव यंत्रणेला नवी दृष्टी आपण देऊ शकतो. संवेदनशील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून यांत्रिक मानवास कान, नाक, डोळे यासारखी पर्यायी संवेदन इंद्रिये आपण त्याला लावू शकतो. यांचाच उपयोग करून आपन मुक्या प्राण्यांना बोलते करू शकू. झाडांना बोलते करू शको. मग ‘मला पाणी पाहिजे’ असे झाड ओरडून सांगू शकेल’. प्राण्यांचे दुःख आपल्या बधीर झालेल्या कानांना ऎकू येऊ शकेल. वंगण नसलेले यंत्र वा गंजलेल्या बिजागिरी असणारे दार असे कुरकुर आवाज करीत आपले लक्ष वेधते त्याप्रमाणे प्रत्येक वस्तु आपल्या तब्बेतीची तक्रार बोलून दाखवू शकेल.

हीच कल्पना पुढे नेली तर खड्डे पडलेले रस्ते, तुंबलेले गटार, गळणारे नळ, तुटलेले रूळ, विजेच्या लोंबकळणार्‍या तारा नगरसेवकाची वा मोर्चांची वाट न पाहता आपले गार्‍हाणे थेट योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवू शकतील. अर्थात या सर्वांना दर वेळी अत्याधुनिक उपकरणांची गरज लागेलच असे नाही. माहिती संकलन व्यवस्था सर्वसमावेशक केली व त्याच्या विष्लेषणाचा योग्य उपयोग केला तर अशा अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतील.

उदाहरणच द्यायचे झाले तर शहरातील प्रत्येक रस्त्याची माहिती म्हणजे तो तयार केव्हा केला, दुरुस्ती केव्हा केली, ट्रॅफिक किती आहे, अपघात किती झाले यांच्या माहितीचा आढावा घेतल्यास रस्त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. हा अंदाज इशारा स्वरुपात संगणकावर दिसू शकण्याची योजना करता येईल म्हणजे रस्ता धोकादायक बनला आहे व तो लगेच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे हे त्या रस्त्याची माहितीच आपल्याला सांगू शकेल. मग लोकांच्या तक्रारीची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करता येईल.

सध्या अशा निर्जीव सेवासुविधांविषयीच्या तक्रार लोक व नगरसेवक संबंधित खात्याकडे करतात. यात जो तक्रार करील वा ज्या नगरसेवकाचा दरारा मोठा त्याच रस्त्याचे भाग्य उजळते. आवश्यकता नसली तरी अशा रस्त्यांचे नूतनीकरण होते. इतर रस्त्यांची स्थिती अगदी खालावलेली असली तरी प्रभावी तक्रारीअभावी त्यांची कोणी दखल घेत नाही. परिणामी एखादा मोठा अपघात सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधतो. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. घडायचे ते घडून गेलेले असते.

जी गोष्ट रस्त्याची तीच प्रत्येक सुविधेची, प्रदूषणाची, धोकादायक परिस्थितीची. या सर्वांना आधुनिक उपरणांच्या व सर्वंकष माहिती व्यवस्थापनाच्या आधारे बोलते केले तर अपघात टळतील, प्रदूषण वाढणार नाही व शहरातील सर्व सेवासुविधा विनातक्रार काम करतील. सर्वांचा विकास लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय केवळ गरज व गुणवत्ता यांच्या आधारे करणे शक्य होईल.